लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट: वितरणात अडथळा येण्याची शक्यता ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ३००० रुपये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर, म्हणजेच १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. या निधी वितरणाची प्रक्रियाही प्रशासकीय पातळीवर सुरू झाली होती, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता या हप्ता वितरणाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात सध्या सुरू असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुका. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा करत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले आहे. मतदानाच्या अगदी काही दिवस आधी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात निधी वितरित करणे, हे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हा एक प्रकारे ‘सरकारी लाच’ देण्याचा प्रकार असून निवडणूक संपेपर्यंत हे पैसे थांबवावेत, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.




















