घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी! ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान कधी आणि कसे मिळणार? पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) टप्पा दोन अंतर्गत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने ५० हजार रुपयांच्या वाढीव अनुदानाची घोषणा केली आहे. हे वाढीव अनुदान नेमके कसे मिळणार आणि त्याची वितरण प्रक्रिया काय असेल, याबद्दल अनेक लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. विशेषतः २०२४-२५ या आर्थिक वर्षात पात्र ठरलेल्या १९ ते २० लाख लाभार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे ५० हजार रुपये थेट रोख स्वरूपात न मिळता त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. यातील ३५ हजार रुपये घरकुलाच्या बांधकामासाठी अतिरिक्त मदत म्हणून दिले जाणार आहेत. उर्वरित १५ हजार रुपये हे लाभार्थ्यांना आपल्या नवीन घरावर सोलर (सौर ऊर्जा) यंत्रणा बसवण्यासाठी दिले जातील. जर एखाद्या लाभार्थ्याने सोलर बसवण्याचा निर्णय घेतला, तर त्याला केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेचे ३० हजार आणि या वाढीव अनुदानातील १५ हजार असे मिळून एकूण ४५ हजार रुपये १ किलोवॅट सोलरसाठी मिळू शकतात.




















