मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तर मतदान करता येईल का? जाणून घ्या सविस्तर…मतदानाला जाण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाव तपासण्यासाठी आता मतदान केंद्रावर चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या राज्य निवडणूक आयोगाच्या ‘महाएसी व्होटर लिस्ट’ (mahasecvoterlist.in) या संकेतस्थळावर किंवा आयोगाच्या अधिकृत ‘मताधिकार’ (Matadhikar) मोबाईल ॲपद्वारे तुमचे नाव शोधू शकता. यामध्ये ‘Search by Name’ हा पर्याय निवडून तुमचे पूर्ण नाव, जिल्हा आणि महानगरपालिकेचे नाव टाकल्यास तुम्हाला तुमचा प्रभाग आणि मतदान केंद्राची संपूर्ण माहिती मिळेल.
अनेकदा मतदारांची तक्रार असते की त्यांच्याकडे ‘मतदार ओळखपत्र’ (EPIC Card) उपलब्ध नाही किंवा ते हरवले आहे. अशा वेळी घाबरण्याचे कारण नाही; कारण केवळ ओळखपत्र नाही म्हणून तुम्हाला मतदानापासून रोखता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे, तुमचे नाव मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. जर तुमचे नाव यादीत असेल, तर निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता.




















